लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑलाइन अर्ज केल्यानंतर दिव्यांगांना आता ऑफलाइन अपॉइंटमेंट घेऊन पुढील वैद्यकीय तपासणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मर्यादित कालावधीतच दिव्यांगांची वैद्यकीय चाचणी आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे शक्य होणार आहे.बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर नियंत्रणासोबतच दिव्यांगांना प्रमाणपत्र सहज उपलब्ध व्हावे, यासाठी सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.कक्षांतर्गत दिव्यांगांना आॅनलाइन अर्ज भरून देण्यासोबतच त्यांची वैद्यकीय चाचणी करणे व त्यानंतर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. आॅनलाइन अर्ज केल्यावर दिव्यांगांना ‘एसएमएस’द्वारे वैद्यकीय चाचणीचा दिवस दिला जातो. ही सुविधा सोयीस्कर असली तरी, दिव्यांगांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. दिव्यांग कक्ष सुरू झाल्यापासून आॅनलाइन अर्ज केल्यानंतर दिव्यांगांना वैद्यकीय चाचणीच्या एसएमएसची सहा ते सात महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.त्यामुळे दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासही उशीर होत असल्याने रुग्णांना अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. दिव्यांगांना होणाऱ्या त्रासाबद्दल महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवक संघटनेचे महानगराध्यक्ष आशिष सावळे यांच्यासह अनेक दिव्यांगांनी तक्रारी केल्यानंतर एसएमएस सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आठवडाभरात आॅफलाइन प्रक्रियेला सुरुवातवैद्यकीय तपासणी होत नसल्याने दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळत नाही. याबाबत विविध संस्था, संघटनांसह दिव्यांगांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारीनंतर एसएमएस सुविधा बंद करण्यात येणार आहे. यासंदर्भात आयुक्त अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्याकडे परवानगी मागण्यात आली असून, आठवडाभरात एसएमएस सेवा बंद करून आॅफलाइन प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कक्षातर्फे देण्यात आली.
दिव्यांग सहा ते सात महिन्यांच्या ‘वेटिंग’वरआॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांना पुढील प्रक्रियेसाठी सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. जोपर्यंत वैद्यकीय तपासणी होत नाही, तोपर्यंत दिव्यांगांना प्रमाणपत्रही मिळणे शक्य नाही. अनेकांना वैद्यकीय तपासणीसाठी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत.