अकोला :यावर्षी तेलबिया पिकातील सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, इतर तेलबिया पिक पेरणीवर भर दिला जात आहे. त्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापासून करडई पिकांच्या नियोजनावर भर दिला आहे. मागच्या दोन वर्षापासून हे क्षेत्र वाढत असल्याचा दावा कृषी विद्यापीठाचा आहे.दिड दशकापुर्वी राज्यात करडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते; सात वर्षापुर्वी राज्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र शिल्लक होते. विदर्भात दोन लाख हेक्टरपर्यत करडई पेरणी केली जात होती. परंतु करडईला उत्पादन खर्चावर दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरवली तसेच हे पीक काटेरी आहे. ते काढण्यासाठी सहज मजूर मिळत नसल्याने त्याचही परिणाम करडई पेरणीवर झाला. पाच वर्षापुर्वीचे चित्र बघितल्यास अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ४१ हजार तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात केवळ एक ते पाच हेक्टर क्षेत्र उरले आहे. अमरावती विभागाचे उत्पादन हे २ हजार मेट्रिक टन आणि उत्पादकता ४९५ किलो प्रतिहेक्टर तर नागपूर विभागातील उत्पादन ३२५ मेट्रिक टन आणि उत्पादकता ३२५ किलो प्रतिहेक्टर होती. विदर्भ वगळता राज्यातील उत्पादन ६७ हजार मेट्रिक टन आणि उत्पादन ५४५ किलो प्रतिहेक्टरी होते. आता गेल्या पाच वर्षांपासून विदर्भातील करडीचे क्षेत्र झपाट्याने घसरले आहे.करडईची पेरणी कमी होत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने करडी पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला असून, यावर्षी अनेक भागात पाऊस चांगला होत असल्याने शेतकºयांना करडी पिकाबाबात मार्गदर्शन केले जात आहे.अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणाºया करडीईच्या अनेक जाती विकसीत केल्या आहेत. यामध्ये बीनकाट्याच्या जातीसह गुलाबी (करडी पिंक ३११) आदी जाती विकसीत केल्या आहेत. याच पृष्ठभूमीवर यावर्षी करडईसह विविध तेलबिया पिक पेरणीचे नियोजन आतापासूनच कृषी विद्यापीठाने केले आहे.
यावर्षी बहुतांश भागात चांगला पाऊस होत असून, जमिनीत ओलावा राहणार असल्याने यावर्षी तेलबिया पिक वाढविण्यावर भर दिला जात आहे. विशेष करू न करडी पिक पेरणीसाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे.डॉ. विलास खर्चे,संचालक संशोधन,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.