अकोला : शेतीच्या वादातून वृद्धाला कारने चिरडून त्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, संशयितांना ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंंंत आकोट फैल पोलिसांकडून या प्रकरणाविषयी सविस्तर खुलासा करण्यात आला नाही. प्रकरणाची गंभीरता पाहता, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा हे रात्री उशिरापर्यंंंत आकोट फैल पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. सीताबाई कला महाविद्यालयाजवळील रोडवर राहणारे प्रकाशसिंग किशोरसिंग बिसेन (६0) यांची आकोट रोडवर पाचमोरीनजिक शेती आहे. वर्षभरापूर्वीच त्यांनी शेतीमध्ये पोल्ट्रीफार्म सुरू केला. दररोज या पोल्ट्रीफार्मवर ते जायचे. त्यांच्या शेतीसंबंधी काही वर्षांंंपासून वाद सुरू होता. प्रकाशसिंग बिसेन हे नेहमीप्रमाणे रविवारी त्यांच्या पोल्ट्रीफार्मवर गेले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ते पोल्ट्री फार्मवर असताना, याठिकाणी दोघेजण इंडिका कारने आले. त्यांचा प्रकाशसिंग यांच्यासोबत वाद झाला. वादामुळे संतप्त झालेल्या दोघा जणांनी प्रकाशसिंग बिसेन यांना कारने चिरडले. गंभीर जखमी झालेले बिसेन हे रक्ताच्या थारोळय़ात पडले. त्यांना उशिरा सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शेतीच्या वादातूनच बिसेन यांना कारने एका गँगमधील आरोपी सलाम खान याने चिरडून त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. परंतू या प्रकरणी तक्रार देण्यास कोणी पुढे येत नसल्याने पोलिसांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. घात की अपघात, याबाबत पोलिसांनी बोलण्यास असर्मथता दर्शविली. रात्री उशिरा पोलिसांनी गँगमधील सलाम खान यास ताब्यात घेतले असून, त्याची इंडिका कारही पोलिसांनी जप्त केली. रात्री ११.३0 वाजतानंतर पोलिसांनी पुन्हा घटनास्थळावर जाऊन या प्रकरणाशी संबंधित काही ठोस माहिती व पुरावे हाती लागतात का? याची चाचपणी केली.
वृद्धाला कारने चिरडले
By admin | Published: July 06, 2015 1:43 AM