आलेगाव: पातूर तालुक्यातील आलेगाव व परिसरात रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास वादळ-वारा सुटला. विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. झाडाखाली थांबलेल्या एका वृद्धाचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला.
७ ते १० मे दरम्यान वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने होता. रविवारी आलेगाव परिसरामध्ये दुपारी ४ वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला. सोबतच विजांचा कडकडाट सुरू झाला. आलेगाव परिसरात बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या तोताराम अमृता नवलकार (६५) यांच्यावर अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, चान्नी पोलीस घटनास्थळी पोहोचले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अकोला येथे पाठविण्यात आला.
अवघ्या काही मिनिटांच्या वादळी वारा व विजांच्या कडकडाटाने आंबा, कांदा, गहू व भुईमूग पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. नुकसानाचा सर्व्हे करून शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.