या निवेदनामध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्यास कर्मचाऱ्यांचा काय फायदा होईल व शासनाचा काय तोटा होईल इत्यादीबाबत चर्चा करण्यात आली. सध्याच्या कोरोना १९ संसर्ग आजाराने आमचे अनेक शिक्षक बांधव शिक्षकेतर कर्मचारी या जगाला शेवटचा निरोप देऊन गेले. त्यांचे कुटुंब आज रस्त्यावर आले आहे. अनेक बांधव सेवानिवृत्त झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचा निवृत्तीनंतरचा लाभ मिळत नसल्यामुळे स्वतःची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ३२ विभागातील दिनांक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत असून फक्त आणि फक्त शालेय शिक्षण विभागावरच हा अन्याय होत असल्याने या निवेदनाद्वारे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन योजना लागू करण्याची शिफारस मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री तसेच कॅबिनेट बैठकीमध्ये प्रस्ताव आल्यानंतर शिफारस करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. अन्यथा यापुढे उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिक्षण संघर्ष संघटना मूर्तिजापूरचे अध्यक्ष दिगंबर भुगूल, सचिव विनोद तायडे, विनोद देवके, गोपाळ सोनोने, सुनील ढोकणे, जाधव सर, संतोष वानखडे, दिवाकर मेहरे, मनोज बाईस्कर, आलासिंग जाधव, विजय कोंडे, नळकांडे, विनोद झोड इत्यादींच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले.
जुनी पेन्शन योजना लागू करावी; शिक्षण संघर्ष संघटनेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:14 AM