तुलंगा येथील रहिवासी असलेल्या लता पंजाबराव तायडे यांनी या तक्रारीत म्हटले की, वत्सलाबाई शेषराव गायगोळे (५५) रा. निंबी मालोकार ही माझी आई आहे. ती मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. हातपाय व अंग दुखत असल्याने ती कापशी रोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे १७ फेब्रुवारीला उपचारासाठी गेली होती. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून औषधे व इंजेक्शन घेण्याकरिता तेथील नर्सकडे पाठविले व नर्सने इंजेक्शन व गोळ्या दिल्या. सदर इंजेक्शन कशाचे आहे असे वृद्ध महिला वत्सलाबाई गायगोळे यांनी विचारणा केली असता पेनकिलर असे सांगण्यात आले. हे इंजेक्शन निष्काळजीपणने व चुकीच्या पद्धतीने दिल्याने वृद्ध महिलेला उजव्या हाताला मुंग्या येऊ लागल्या व हात ठणकून हातात जळजळ वाटू लागली. त्याबाबत रुग्ण वृद्ध महिलेने नर्स व वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता, वैद्यकीय अधिकारी यांनी भारी इंजेक्शन आहे, औषधी दिली आहेत, बरे वाटेल काळजी करू नका, असे बोलून रुग्ण वृद्ध महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रातून चालते केले. त्यानंतर हाताची दुखापत वाढतच गेल्याने वृद्ध महिलेने प्राथमिक आरोग्य केंद्रात विचारणा केली असता, वैद्यकीय अधिकारी व नर्स यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वृद्ध महिलेच्या हाताची दुखापत वाढतच चालली असताना त्यांनी अकोला येथील सामान्य रुग्णालयात तपासणी केली असता, त्यांचे रिपोर्ट नील निघाले. त्यानंतर अकोला येथील खासगी रुग्णालयात हाताची तपासणी केली असता चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन देण्यात आल्याने हात निकामी झाल्याचा खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिला.
फोटो:
वृद्ध महिलेसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न!
या महिलेच्या हातावर उपचार सुरू असून, हाताला प्लास्टर बांधलेले आहे. त्यामुळे वृद्ध महिलेचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व कारणाला वैद्यकीय अधिकारी व नर्स कर्मचारी दोषी असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वृद्ध महिलेची मुलगी लता पंजाबराव तायडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारीतून केली आहे.