अकोला: वेदनांनी त्रस्त रुग्णांच्या गर्दीत ग्रामीण भागातून आलेला एक वयोवृद्ध रुग्ण; जो आपल्या बासरीच्या सुमधुर लयींनी रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालत आहे. पातूर तालुक्यातील साहेबराव देशमुख असे त्या रुग्णाचे नाव असून, त्यांच्या बासरीच्या सुरांनी गत आठवड्यापासून येथील रुग्ण व डॉक्टरांच्या मनाला भुरळ घातली आहे.
एरवी रुग्णांची गैरसोय म्हणून सर्वोपचार चर्चेत असते; परंतु यंदा हे रुग्णालय चर्चेत आहे, ते एका वयोरुद्ध रुग्णाच्या बासरीमुळे. गत आठवड्यात पातूर तालुक्यातील हिवरा येथील साहेबराव वामनराव देशमुख (८०) हे पाय मोडला म्हणून सर्वोपचारमध्ये दाखल झाले. त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाली अन् त्यांना वॉर्ड क्रमांक १८ मध्ये हलविण्यात आले. वेदनांनी त्रस्त साहेबरावांनी वेळ जात नाही म्हणून बासरी वाजवायला सुरुवात केली. त्यांच्या बासरीच्या सुमधुर लयींनी मात्र कमालच केली. त्यांच्या बासरीच्या सुमधुर सुरांनी अनेकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. शिवाय, अनेक रुग्ण आपल्या वेदनाही विसरले. डॉक्टरांनाही त्यांच्या बासरीने भुरळ घातली अन् बासरी ऐकायला ते वॉर्डात भेट द्यायचे. कधी नव्हे, ते या आठवड्यात साहेबरावांना भेटायला इतरही रुग्ण येऊ लागले. एक उत्साह, नवचैतन्याच्या वातावरणात बुधवारी त्यांना रुग्णालयातून सुटी झाली; मात्र त्यांच्या जाण्यामुळे अनेकांचे डोळे पाणावले.सामाजिक कार्यकर्त्यांनी केला सत्कारसुमधुर संगीतच्या माध्यमातून रुग्णांच्या वेदनेवर हुंकार घालणाऱ्या पातूर येथील साहेबरावांच्या या कलेला सलाम करत डॉक्टरांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. श्रद्धा रजोरिया, डॉ. नीता पुंडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे निखिल खानझोडे, शहराध्यक्ष आशीष सावळे, नितीन सपकाळ, प्रदीप अठकरे यांची उपस्थिती होती.
साहेबराव देशमुख या वयोरुद्ध रुग्णाच्या बासरीमुळे वॉर्डातील इतर रुग्णांच्या तब्बेतीमध्ये वेगाने सुधारणा झाली. त्यांच्या या कलेमुळे रुग्णांमध्ये नवचैतन्य दिसून आले.- डॉ. नीता पुंडे, सीएमओ, जीएमसी