अकोला: डाबकी रोडवर २९ ऑगस्ट रोजी एका बारजवळ दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना डाबकी रोडवरील तीन युवकांनी रंगेहात पकडले आणि डाबकी रोड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. परंतु पोलिसांनी चोरांनी पकडणाऱ्या युवकांना क्रेडिट न देता, स्वत:च दुचाकी चोरट्यांना अटक केल्याचे वृत्त दिले.
डाबकी रोडवरील लक्ष्मी नगर राजेंद्र वसंतराव मुंगीकर (४४) यांच्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी डाबकी रोडवरून त्यांची दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणात त्यांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर मुंगीकर हेसुद्धा दुचाकीचा शोध घेत होते. २९ ऑगस्ट रोजी रात्रीदरम्यान डाबकी रोडवर एका बारसमोर दोन जण दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत असताना, राजेंद्र मुंगीकर व राहुल भारती, स्वराज सानप यांनी दोघांनी पकडले आणि डाबकी रोड पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी आरोपी अक्षय संजय तराळे, शुभम विजय अंबिलवादे रा. शेगाव यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून डाबकी रोड हद्दीतील तीन, बाळापूर पोलिस स्टेशन हद्दीतून तीन मोटारसायकल अशा सहा मोटारसायकल, दोन मोबाईलसह एकूण तीन लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कारवाई डाबकी रोडचे ठाणेदार किशोर जुनघरे, पीएसआय संभाजी हिवाळे, सुनील टोपकर, दीपक तायडे यांनी केली.