अकाेला : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मुद्यावर महापालिकेकडून दरवर्षी राबविले जाणारे नियाेजन कोलमडते, असा अनुभव आहे. अवकाळी पावसाने तडाखा दिल्यावर नाले सफाई न झाल्याने अकाेला शहरात सगळीकडे पाणी तुंबते. त्यामुळे यंदा तरी मान्सून पूर्व नाले सफाई हाेईल का? हा प्रश्नच आहेच.
गेल्या वर्षी ७५ लाखांची तरतूद, पण अर्धेच नाले साफ
गेल्या वर्षी प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी नाले सफाईसाठी ७५ लाखांची तरतूद केली. हाेती तसेच झाेननिहाय कंत्राट न देता एकाच कंत्राटदाराची नियुक्ती केली. मात्र, गेल्या जून महिन्यांत कंत्राटदाराने केवळ ३६ नाल्यांची सफाई केली व उर्वरित नाले तसेच तुंबलेले राहिले. त्याचा अकाेलेकरांना पावसाळ्यात माेठा फटका बसला.
पुन्हा २१ जुलैची पुनरावृत्ती नकाे
गतवर्षी काेराेनाच्या साथीमुळे मान्सून पूर्व नाले सफाईची कामे हाेऊ शकली नव्हती. परिणामी, शहरातील सर्वच नाले घाणीने तुडुंब साचले. त्यात २१ जुलैच्या रात्री मुसळधार पाऊस आला व या पाण्याचा निचरा न झाल्याने अकाेल्यात नाले तुंबून अनेकांच्या घरात पाणी शिरले. ही पुनरावृत्ती नकाे असेल तर यंदा मान्सून पूर्व नाले सफाई वेगाने हाेणे अपेक्षित आहे.
शहरात ३०० च्या वर नाले
मनपाची हद्दवाढ झाल्याने शहरात सुमारे ३०० च्या आसपास लहान-माेठे नाले आहेत. हे नाले साफ न झाल्याने गेल्यावर्षी आलेल्या
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम व दक्षिण झाेन मधील नागरिकांना बसला. पावसाचे पाणी वाहून न जाता नागरिकांच्या घरात शिरले.