अकोला : शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे शुक्रवारी आयोजित ‘ओबीसी संवाद’ बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मंथन करण्यात आले असून, आम्ही शिवबा, ज्योतिबा आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करू, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी या बैठकीत केले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रयतेचे स्वराज निर्माण केले. ज्यामध्ये शेतकऱ्यांना, स्त्रियांना व वंचितांना स्वाभिमानाचे जीवन मिळाले होते. वर्तमानातील प्रस्थापित राजकारण्यांना शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची सत्ता घालवून स्वतःची व भांडवलदारी सत्ता निर्माण करायची आहे, असा आरोप करीत आम्ही या धोरणाचा जोरदार विरोध करणार असून, लढा उभारून आम्ही शिवबा ज्योतिबा आणि बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करू, असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी प्रा. अंजली आंबेडकर व युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही विचार मांडले.
बैठकीचे प्रास्ताविक प्रदीप वानखडे यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा परिषद सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी केले. या बैठकीला ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.