देशभरात श्रीराम जन्मोत्सवानंतर आता हनुमान जयंतीचा उत्सवही मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यत व सर्वसामान्य जनतेनंही हनुमान जयंती उत्सवात सहभाग घेत हनुमान जयंतीचा उत्सव यंदा लोकोत्सव केल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील अनेक प्रसिद्ध हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर, अनेक ठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र, अकोल्या एका ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यायला चक्क वानरसेनाच आली होती. ह्या प्रसाद भोजनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
बंजरंगबली हनुमान हे वानरकुळात जन्मलेले. त्यामुळे, प्रभू श्रीराम यांना वनवासात मदत करणाऱ्या वानरसेनेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच वानराकडे पाहिल्यानंतर हनुमंताची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यातच, हनुमान जयंतीनिमित्त मारुतीरायाच्या मंदिरात चक्क वानरसेनेची पंगत बसली होती. अकोला जिल्ह्याच्या बार्शी-टाकळी तालुक्यातील कोथळी खुर्द गावातही काल उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. येथे हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखी पंगत पार पडली. कारण, ही पंगत ना गावकऱ्यां होती ना माणसांची, ही पंगत होती माकडांची. गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं माकडांना मिष्टान्नाची पंगत देण्यात आली. विशेष म्हणजे, माकडांनीही अगदी शिस्तीत हा पंगतीचा आस्वाद घेत मिष्टान्नांवर ताव मारलाय.
रामदास महाराजांनी या पंगतीत वानरसेनेसोबत जेवण केलं. या पंगतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.