अकोला - खंडग्रास सुर्यग्रहणाचा नजारा अनुभवल्यानंतर लवकरच आणखी एका खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य अकोलेकरांना लाभणार आहे. येत्या मंगळवारी (दि. ८) ग्रस्तोदीत खंडग्रास चंद्रग्रहण होणार असून, चंद्रोदयाच्या वेळीच हा खगोलीय नजारा अनुभवता येणार आहे. मुळात चंद्रग्रहण लागलेल्या स्थितीच उदय होणार असल्यामुळे हा नजारा आकर्षक राहणार आहे.
यावर्षातील हे दुसरे ग्रहण असून, भारतातून दिसणारे हे पहिले चंद्रग्रहण असणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी ग्रहणस्थितीत सूर्याचा अस्त पाहिल्यानंतर आता मंगळवारी ग्रहण स्थितीतच चंद्राचा उदय नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. प्रत्यक्ष ग्रहण स्पर्श दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी होईल. परंतु, आपल्या भागात चंद्राचा उदय सायंकाळी ५ वाजून ४१ मिनिटांनी होणार असल्याने आपल्याला ग्रहण संपेपर्यंत त्याचा आनंद घेता येणार आहे.
पूर्व भारतात खग्रास स्थिती
पूर्व भारतात ९० रेखांशा पलिकडे असलेल्या भागात ग्रहण खग्रास स्थितीत असेल, तर उर्वरित भागात हे ग्रहण खंडग्रास स्थितीत पाहता येईल.सूर्य, चंद्र व पृथ्वी एकाच रेषेत येतात तेव्हा पृथ्वीच्या सावलीत चंद्र आल्यावर चंद्राचा तेवढा भाग पृथ्वीवरून दिसू शकत नाही. हीच अवस्था चंद्र ग्रहणाची असते.ग्रहण ही एक खगोलीय घटना असून, त्याबाबत असलेल्या गैरसमजुतीला फाटा देऊन आकाश निरीक्षणाचा छंद असलेल्यांसोबतच इतरांनही मनमुरादपणे या नजाऱ्याचा आनंद घ्यावा.- प्रभाकर दोड, खगोल तज्ज्ञ, अकोला