- संतोष येलकर
अकोला: पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांसाठी शासनामार्फत १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असला तरी, कामांचा रखडलेला आराखडा आणि पावसाळा तोंडावर असताना उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील शेत-पाणंद रस्त्यांची कामे आता केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी आणि यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्याकरिता शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने शासनाच्या रोहयो व नियोजन विभागाच्या गत २७ फेबु्रवारी रोजीच्या निर्णयानुसार विविध योजनांच्या अभिसरणातून पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी शासनामार्फत १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी गत २५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील शेत-पाणंद रस्ते कामांचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. तसेच पावसाळा तोंडावर आला असून, पावसाळ्यात शेत-पाणंद रस्त्यांची कामे होऊ शकणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध असला तरी, आता पाणंद रस्त्यांची कामे केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एकाही तालुक्यातील कामांचा प्राप्त नाही आराखडा!पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत तालुक्यातील कामांचा आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदार, पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना २५ मे रोजी पत्राद्वारे देण्यात आले; परंतु एकाही तालुक्यातील पाणंद रस्ते कामांचा कृती आराखडा अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो शाखेकडे प्राप्त झाला नाही. तालुकानिहाय कामांचे प्रस्ताव प्राप्त झाले नसल्याने, जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांचा कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया रखडली आहे.सातही तालुक्यांना निधी वितरित!शेत-पाणंद रस्ते कामांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी २१ लाख रुपयेप्रमाणे अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांसाठी १ कोटी ५० लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयांना सोमवारी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार वितरित करण्यात आला.