अकोला: जिल्ह्यात कोविड लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकांना दुसरा डोस उपलब्ध होत नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत सुमारे दीड लाख लाभार्थींना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. कोविड लसीकरणाची सुरुवात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह इतर फ्रंटलाइन वर्कर्सपासून झली. प्रारंभी अनेकांनी लसीकरण टाळले. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. लाभार्थींची संख्या वाढू लागल्याने लसीचा तुटवडा भासू लागला. त्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीपासून वंचित राहावे लागले. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २ लाख ३ हजार ४३६ लाभार्थींनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी केवळ ५३ हजार ९९९ लाभार्थींनाच लसीचा दुसरा डोस मिळू शकला. दोन्ही डोसमधील ठरवून दिलेला कालावधी अनेकांनी पूर्ण करूनही त्यांना लसीचा दुसरा डोस प्राप्त झाला नाही. त्यामुळे अद्यापही जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४९ हजार ४३७ लाभार्थींना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. यातील अनेक लाभार्थींना कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची गरज आहे. मात्र, ही लस सद्यस्थितीत उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागासमोर मोठी पंचाईत होत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईन वर्कर्सचेही लक्षणीय प्रमाण आहे.
वयोगटानुसार लसीकरण
१८ ते २४ - ३३३५०
४५ ते ६० - ८५,३८२
६० वर्षांवरील - ८४,६४७
एकही डोस न घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय
जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने लस न घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. यामध्ये फ्रंटलाइन वर्करसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. लस न मिळाल्याने हे कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहे.
मध्यंतरी १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील लाभार्थींच्या लसीकरणास सुरुवात झाल्याने, ४५ वर्षांवरील लाभार्थींच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या टप्प्यात ज्यांनी लसीचा पहिला डाेस घेतला होता, अशांना दुसरी लस घेणे शक्य झाले नाही.
मागील महिन्याभरापासून कोव्हॅक्सिनचा पुरवठाच झाला नाही. त्यामुळे अनेक लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही मिळाला नाही. यामध्ये फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.