खामगाव : मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर शिवारात बुलडाणाच्या गुन्हे शाखा पथकाने शुक्रवारी सापळा रचून एका इसमास अटक केली. त्याच्या जवळून देशी कट्टा व काडतुस जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक पी.डी. शिकारे यांना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने १0 जून रोजी तालुक्यातील धुपेश्वर शिवमंदीर परिसरात सापळा रचला. यावेळी सतीष दिनकर तळेकार (वय २१) रा.आडविहीर ता.मोताळा हा स्वत:जवळ देशी कट्टा जिवंत काडतुससह बाळगताना आढळून आला. सतीषची झडती घेतली असता त्याचेजवळ एक देशी बनावटीचा कट्टा व चार जिवंत काडतुस आढळून आले. उपरोक्त ऐवजासह त्याचे ताब्यातील मोटारसायकल असा एकुण ५0 हजार ८00 रूपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. याप्रकरणी सतीष दिनकर तळेकार (वय २१) रा.आडविहीर याचेविरुध्द पो.स्टे. दसरखेड एमआयडीसी येथे आर्मअँक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक संजयकुमार बावीस्कर, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती श्वेता खेडकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पी.डी. शिकारे, पोउपनि मोहसिन सैय्यद व प्रकाश राठोड, पोहेकाँ केशव नागरे, राजु ठाकुर, अताउल्ला खान, रामु मुंढे, पोकाँ संदीप मोरे, शे.नदीम, विवेक तायडे यांनी पार केली.
देशी कट्टय़ासह एकास अटक
By admin | Published: June 12, 2016 2:46 AM