अकोला : जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते कामांना जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक कोटी रुपयांच्या निधीतून अंतर्गत रस्ते व रस्ते दुरुस्तीची कामे करण्यास या सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच पंधराव्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध निधीतून विकासकामांचे काय नियोजन करण्यात आले, यासंदर्भात समिती सदस्यांनी सभेत विचारणा केली. जिल्हा परिषद परिसरात पेव्हर बसविण्यासह कार्यालय इमारतींच्या दुरुस्ती कामांच्या खर्चासही या सभेत मंजुरी देण्यात आली. समितीच्या मागील सभेचे इतिवृत्त या सभेत मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ‘ऑनलाइन’ पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेत जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सदस्य, कार्यकारी अभियंत्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.