लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला असून, तिसऱ्या लाटेत बालके व युवकांना अधिक संक्रमण होण्याची शक्यता आहे; मात्र या संदर्भात राज्यात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसून, राज्य सरकार झोपेत असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांचे मुंबईकडे आणि उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीकडे लक्ष असून, राज्य वाऱ्यावर असल्याचे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी येथे सोडले.
अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाची तिसरी लाट वर्तमान संक्रमणापेक्षा चारपट अधिक राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामध्ये विशेषतः १८ वर्षांखालील बालके आणि युवकांना संक्रमण होण्याची शक्यता आहे, परंतु तिसरी लाट नियंत्रित करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसून, राज्य सरकार झोपलेले आहे. मुख्यमंत्र्यांचे केवळ मुंबईकडे आणि उपमुख्यमंत्र्यांचे केवळ बारामतीकडे लक्ष असून, महाराष्ट्र राज्य वाऱ्यावर असल्यासारखी परिस्थिती असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, राज्य सरकारने किमान जिल्हानिहाय ‘डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी’ स्थापन केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. कोरोनाबधित रुग्णांसाठी सरकारने रुग्णवाहिकांची सोय करावी, नाहीतर खासगी गाड्या रुग्णवाहिका म्हणून वापरण्याची परवानगी देण्याची मागणीही आंबेडकर यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, डॉ. प्रसन्नजीत गवई, चंद्रशेखर पांडे गुरुजी, पराग गवई, आदी उपस्थित होते.
--------------
शासनाची हलगर्जी; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो!
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये शासनाच्या हलगर्जीपणामुळे राज्यात लोक दगावले असून, या संदर्भात शासनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
------------------------
लसींचा तुटवडा : मोदी सरकार जबाबदार!
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लसींचा तुटवडा निर्माण होणे, लसीकरणाचा कालावधी २८ दिवसांवरुन ८४ दिवसांपर्यंत वाढविणे, या सर्व प्रकाराला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचे कोणतेही धोरण नाही, असेही त्यांनी सांगितले.