अकोला: काटेपूर्णा प्रकल्पातील अलीकडचा जलसाठा लक्षात घेत शंभर टक्के सिंचन शक्य असल्याची माहिती अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि.वि. वाकोडे यांनी जिल्हाधिकारी यांना एका पत्रन्वये पाठविली आहे.आमदार रणधीर सावरकर यांनी३१ आॅक्टोबर १९ रोजी दुपारी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात रब्बी हंगाम २०१९-२० च्या सिंचन नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानुसार काटेपूर्णा प्रकल्पावर शंभर टक्के सिंचन शक्य असल्याचे सांगितले गेले. त्यानुसार पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अलीकडील जलसाठा टक्केवारी कळविली आहे. संदर्भीय पत्र क्र. २ नुसार पाटबंधारे कार्यालयाने ४०० लक्षची प्रापण सूची मंडळ कार्यालयास सादर केली होती; परंतु मंडळ कार्यालयाचे संदर्भीय पत्र क्र. ३ नुसार १५ आॅक्टोबर १९ च्या पाणीसाठ्यानुसार प्रापण सूची सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.सद्यस्थितीत काटेपूर्णा प्रकल्पमध्ये ८२.२ दलघमी (९५.८८) पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामचे नियोजन १५ आॅक्टोबरच्या साठ्यानुसार न करता, ३१ आॅक्टोबरच्या अनुषंगाने करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्यात. सोबतच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांना काटेपूर्णा प्रकल्पावर देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरिता अतिरिक्त निधीची मागणीची सूचनाही करण्यात आली. २० ते २८ आॅक्टोबरदरम्यान झालेल्या पावसामुळे या विभाग अंतर्गत असलेल्या काटेपूर्णा मोठा प्रकल्प, निर्गुणा, उमा व मोर्णा मध्यम प्रकल्प व ३१ लघुप्रकल्पांच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे १९-२० करिता या विभागास २ कोटी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.