लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात १७ फेब्रुवारी रोजी तीन वेगवेगळ्य़ा अपघातात एक ठार तर चार जखमी झाले. म्हातोडी ते कासली रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार झाला. देवरी-बळेगाव फाट्यादरम्यान दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी झाला तर बाळापूर शहराजवळील वळणावर दुचाकी अपघातात दोघे जखमी झाले. कैलास प्रभाकर पाकदुणे असे मृताचे नाव आहे.दोनवाडा येथील कैलास पाकदुणे (२२)व पवन विनायक झटाले हे दुचाकी क्र.एमएच ३0 एके ७६७0 ने शनिवारी अकोल्याकडे येत होते. दरम्यान, याच रस्त्याने अकोल्याकडे येत असलेल्या ट्रक क्र.एमएच ३0 बीडी 0८२१ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. ट्रकच्या धडकेने दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी ट्रकच्या समोरच्या चाकाखाली सापडली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन दोन्ही जखमींना अकोला येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान कैलास पाकदुणे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते.
संतप्त ग्रामस्थांनी फोडल्या ट्रकच्या काचा या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कैलास पाकदुणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी अपघातग्रस्त ट्रकच्या काचा फोडल्या. ग्रामस्थ संतप्त झाल्याने घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे एसडीपीओ माने, रामदासपेठ पोलीस स्टेशनचे सपकाळ, वाहतूक शाखेचे ठणेदार विलास पाटील, आरसीपीच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी दोनवाडा येथील सरपंच श्रीकृष्ण झटाले, कासलीचे सरपंच बाबूराव इंगळे, पं.स.सदस्य रामचंद्र घावट यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
खड्डय़ांमुळे दुचाकी अपघात; एक गंभीर१७ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान अकोलावरून अकोटकडे शिक्षक पतसंस्था अकोटचे कर्मचारी मुकुंद मुरलीधर मोरे (४८) रा. अकोट हे दुचाकी क्र. एमएच ३0 एक्यू. ९८५६ ने जात होते. देवरी-बळेगाव फाट्याच्या मध्ये असलेल्या खड्डय़ांमुळे दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये मुकुंद मोरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मार्गावर असलेल्या खड्डय़ांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे, खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.