अकाेला : शहरासह जिल्ह्यात एक लाख ३७ हजारांपेक्षा अधिक दुचाकींचा विमा नसतानाही त्या रस्त्यावर बिनधास्त धावत असल्याची माहिती समाेर आली आहे. ज्या वाहनचालकांनी बॅंकेचे कर्ज घेऊन दुचाकी विकत घेतली ते कर्ज असेपर्यंत या दुचाकीचा विमा काढण्यात येताे, मात्र बॅंकेचे दुचाकीवरील कर्ज निल हाेताच दुचाकीचा विमा काढण्याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात ५७ हजारांपेक्षा अधिक चारचाकी वाहने असून, दाेन लाख ४० हजारांपेक्षा जास्त् दुचाकी आहेत. यासाेबतच दाेन हजारांवर ट्रक आणि ट्रान्सपाेर्ट व्यवसायात असलेली चारचाकी वाहने वेगळी आहेत. या वाहनांची संख्या चार लाखांच्या घरात असून, यामधील एक लाख ३७ हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांनी विमा काढला नसल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. वाहनचालक विमा काढतात कींवा नाही यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचा वाॅच असताे मात्र लाखाे वाहनांची ही तपासणी करणे त्यांनाही माेठ्या अडचणीचे असल्याने वाहनचालक विमा काढण्याकडे पाठ करीत असल्याची माहिती समाेर आली आहे. वाहनांचा विमा नसताना अपघात झाल्यास याचे परिणाम भयंकर असतानाही याकडे वाहनचालक सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने ही वाहने धाेकादायक ठरत आहेत. दीड लाखांपेक्षा अधिक दुचाकी या विमा न काढताच रस्त्यावर असल्याची माहिती असून, यासह दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या चारचाकी वाहनांचाही विमा काढण्याकडे कानाडाेळा करण्यात येत असल्याची माहिती समाेर आली आहे.
विमा नसल्याचे धाेके
एखाद्या वाहनाचा विमा नसतानाही ते वाहन रस्त्यावर चालत असेल आणि अशात अपघात झाल्यास वाहनचालकाला माेठा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. यासाेबतच न्यायालयात खटला चालल्यानंतर शिक्षा हाेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विमा न काढताच वाहन चालविण्याचे संभाव्य धाेके जास्त असल्याने वाहनचालकांनी विमा असतानाच वाहन चालवावे.
वाहनाचा विमा नसताना वाहन रस्त्यावर चालविणे दंडनीय अपराध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काेणत्याही वाहनचालकाने असा प्रकार करू नये. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा वारंवार कारवाई करण्यात येते. मात्र लाखाे दुचाकींवर तांत्रिकदृष्ट्या कारवाई करणेही शक्य नाही. त्यामुळे वाहनचालकांची सजगता बाळगून विमा काढणे गरजेचे आहे.
- विनाेद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकाेला