अकोला : शहरी भागातील ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचे अर्ज केवळ आॅनलाईनद्वारेच करावे, या महावितरणच्या आवाहनास ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, मागील दोन महिन्यात सुमारे १ लाख ७ हजार ३४८ ग्राहकांनी नवीन वीजजोडण्यांसाठी महावितरणकडे आॅनलाईन अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या ग्राहकांना वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.नवीन ग्राहकांना पारदर्शकपणे व त्वरित वीजजोडणी मिळावी, यासाठी महावितरणने मोबाईल अॅप, संकेतस्थळ व हेल्पडेस्क अशा विविध सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शहरी भागातील ग्राहकांसाठी १ नोव्हेंबर २०१८ पासून नवीन वीजजोडणीचे अर्ज आॅनलाईनव्दारेच करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच ग्राहकांना आॅनलाईनव्दारे अर्ज करण्यात येणाऱ्या अडचणी संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांनी सोडवून आॅनलाईनद्वारेच अर्ज करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश क्षेत्रिय अधिकाºयांना देण्यात आले होते.नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ या दोन महिन्यांत महावितरणच्या संकेतस्थळावर ९३ हजार ९० ग्राहकांचे तर मोबाईल अॅपद्वारे १४ हजार २५८ ग्राहकांचे नवीन वीजजोडणीसाठी आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय आॅनलाईन संबंधित विविध स्त्रोतांकडून मागील दोन महिन्यांत सुमारे २ लाख २४ हजार २४२ नवीन ग्राहकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. याठिकाणी वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आॅनलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्राहकांनी नवीन वीज जोडणीसाठी आॅनलाईन सुविधेचाच लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे.