अकोला: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंत योगिराज छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची ३१ मार्च बुधवार रोजी तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
जुने शहरात जय बाबळेश्वर सामाजिक प्रतिष्ठान तसेच जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे मोठ्या उत्साहात तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यावर्षी संसर्गजन्य कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे तसेच जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार मंडळाच्यावतीने अत्यंत साधेपणाने ३१ मार्च रोजी रेणूका नगर येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा तसेच प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक गोपालजी खंडेलवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, शहर प्रमुख अतुल पवनीकर, माजी उपमहापौर वैशाली शेळके, माजी स्थायी स्थायी समिती सभापती सतीश ढगे, नगरसेविका मंजुषा शेळके, रंजना विंचनकर, मंगला म्हैसने, नगरसेवक विजय इंगळे, अजय शर्मा, तुषार भिरड, माजी नगरसेवक हरिभाऊ काळे, विलास शेळके,मनोज गायकवाड़, जयंत मसने, प्रशांत अवचार आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
श्रीराम मंदिरासाठी एक लाखांची देणगी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. या देणगीचे प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित मान्यवरांनी विमोचन केले. ही देणगी अंजनगाव सुर्जी येथील मठाधिपती परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या स्वाधीन केली जाणार आहे.