अकोला: राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचा भाग म्हणून येथून जवळच असलेल्या ग्राम कुंभारी येथील जय बजरंग मंडळाच्यावतीने शनिवारी एक हजार वृक्षांची लागवड केली. जय बजरंग मंडळाच्या शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात मान्यवरांसह सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी कडूनिंबाच्या रोपांची लागवड केली. अवघ्या दहा मिनिटांत एक हजार रोपे लावून मंडळाने केलेला संकल्प पूर्णत्वास नेला.जय बजरंग मंडळद्वारा संचालित जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक, हनुमंत विद्यालय, श्री गणेश कला महाविद्यालय, जय बजरंग शारीरिक शिक्षण महाविद्यालय कुंभारीच्यावतीने मंडळाचे संस्थापक प्रा. तुकाराम बिडकर यांच्या मार्गदर्शनात मंडळाच्या परिसरात वृक्षारोपण केले. समारंभाचे अध्यक्ष जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्रमुख अतिथी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे, सरपंच संतोष भटकर, जिल्हा शिक्षण समन्वयक प्रकाश अंधारे, भारत कृषी क्रांतीचे संस्थापक ए. एस. नाथन, मुख्याध्यापक संघटनेने प्रांताध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिडकर, मंडळाचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम झाला.प्रा. बिडकरांनी आपल्या प्रास्ताविकातून वृक्षाची निगा राखण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. नाथन व पांडे यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रकाश मुकुंद यांनी विद्यार्थी वृक्ष लागवड व पर्यावरण यांचा सहसंबंध सांगून वृक्ष लागवड हे राष्ट्रीय कार्य आहे. यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी असावे, सर्व समाज घटकांना या राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने शिक्षक व विद्यार्थ्यांची आहे, असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्रीराम पालकर यांनी केले. राजदत्त मानकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे संचालक मनोहर पांडव, काशीराम आगळे, डॉ. नारायण बिरकड, श्रीकृष्ण बिरकड, प्राचार्य विलास इंगळे, प्राचार्य डॉ. के. व्ही. मेहरे, प्राचार्य डॉ. मधुसुदन मारवाल, मुख्याध्यापक दिनकर धामणकर, जय बजरंग विद्यालय, हनुमंत विद्यालय, श्री गणेश कला महाविद्यालय, बी.पी.एड. कॉलेज येथील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी मान्यवरांसह सर्व उपस्थितांनी कडूनिंब रोपांची लागवड शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात केली.