अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील दोनपैकी एक डायलिसिस मशीन बंद असल्याची माहिती समोर आली आहे. सुरू असलेली मशीन कोविड वॉर्डजवळ असून, या ठिकाणी सर्वसाधारण डायलिसिस रुग्णांचेही डायलिसिस केले जाते. कोरोनाच्या भीतीने अनेक जण या ठिकाणी डायलिसिस करणे टाळत असल्याचे चित्र आहे. लॉकडाऊननंतर सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. इतर रुग्णांप्रमाणेच अत्यावश्यक उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचीही गर्दी वाढत आहे. यामध्ये डायलिसिसच्या रुग्णांचाही समावेश आहे, परंतु मागील अनेक दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयातील दोन पैकी एक डायलिसिस मशीन बंद आहे. तांत्रिक बिघाडामुळे ते बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी दुसरे मशीन सुरू असल्याने रुग्णसेवा सुरळीत सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, हे मशीन कोविड वॉर्डजवळच असल्याने या ठिकाणी जाण्यास रुग्ण टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे डायलिसिससाठी रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अधिष्ठातांच्या स्वाक्षरीसाठी मशीन दुरुस्तीचे काम रखडले आहे. या संदर्भात विविध संघटनांकडून निवेदनही देण्यात आले आहे.
सीटी स्कॅन मशीनही अधूनमधून बंद
डायलिसिसपेक्षा जास्त सिटी स्कॅनसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या मशीनवरील भार वाढल्यास हे मशीनही अधूनमधून बंद पडत असल्याचे दिसून येते. कोविडच्या गंभीर रुग्णांचे सिटी स्कॅनही याच मशीनवर केले जात असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी हे मशीन जवळपास तीन ते चार तास बंद ठेवले जात असल्याची माहिती आहे. निर्जंतुकीकरणानंतर या मशीनचा इतर रुग्णांसाठी वापर केला जातो. त्यामुळे रुग्णांना सीसी स्कॅनसाठी ताटकळत बसावे लागते. अनेकदा रुग्णांना सीटी स्कॅनसाठी सर्वोपचार रुग्णालयात चकरा माराव्या लागतात.
सर्वोपचार रुग्णालयातील डायलिसिस मशीन बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. दुसरे मशीन सुरू असले, तरी ते कोविड वॉर्डजवळ असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात अधिष्ठाता यांच्याकडे वारंवार निवेदनही दिले असून, ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन तक्रारही दिली आहे. तरी अद्यापही हे मशीन सुरू झालेले नाही.