अकोला : जिल्ह्यात पोलीस व जनता यांच्यातील दुरावलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अकोला जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या ८२१ गावांमध्ये ५५२ पोलिसांना कार्यरत ठेवण्यात येत आहे. यासाठी व्हाटसअॅप गृपही तयार करण्यात आले असून, त्या माध्यमातून तक्रारींचे निरसनही करण्यात येत आहे.
एक गाव आणि बारा भानगडी, असे म्हणत. गावातील भांडणातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाले आहे. याशिवाय गावपातळीवर पोलिसांची प्रतिमाही हवी तेवढी स्वच्छ नाही. त्यामुळे प्रभावी पोलिसिंग व जनता-पोलीस सुसंवादाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांनी १५ ऑगस्टपासून ‘एक गाव, एक पोलीस’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. गावात होणाऱ्या सर्व प्रकारच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेनुसार जिल्ह्यात २३ पोलीस ठाण्यांतर्गत ८२१ गावांकरिता ५५२ अंमलदार नियुक्त करण्यात आले आहे. या अंमलदारांची चार विभागात विभागणी करण्यात आली आहे. त्यांचे व्हाटसअॅप गृप तयार करून त्या माध्यमातून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रयत्न केला जात आहे.