अकोला : शहरात सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू झाली असून, लहान-मोठ्या गणेश मंडळांकडून मंडप उभारणी केली जात आहे. अशा सर्व मंडळांना विविध प्रकारच्या परवानग्या एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशातून महापालिकेच्या मुख्य सभागृहात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गणेश भक्तांसाठी १२ सप्टेंबरपर्यंत ही योजना सुरू राहील.शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह लहान-मोठे मंडळ कामाला लागले आहेत. येत्या १३ सप्टेंबर रोजी बच्चे कंपनीपासून ते घरातील आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांचे मोठ्या थाटात आगमन होणार आहे. शहरातील नामवंत गणेश मंडळांकडून भव्यदिव्य गणेश मूर्तींची स्थापना करून आकर्षक मंडप उभारल्या जातात. त्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. मंडप उभारणी, विद्युत रोषणाई तसेच मागील वर्षीचा आर्थिक हिशेब सादर करण्यासाठी लहान-मोठ्या सर्वच मंडळांना मनपासह पोलीस प्रशासन, महावितरण कार्यालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय आदी शासकीय कार्यालयांच्या पायºया झिजवाव्या लागतात. हा मानसिक त्रास कमी व्हावा, गणेश भक्तांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या रीतसर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या मुख्य सभागृहात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत गणेश मंडळांना अर्ज सादर करता येतील. ही मुदत १२ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे.आज गणेशोत्सव मंडळाची बैठकयंदा शहरात गणेश उत्सवाचे १२५ वे शतकोत्तर रजत जयंती वर्ष साजरे केले जाईल. या पृष्ठभूमीवर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने उद्या बुधवारी दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये मंडळांचे पदाधिकारी, सदस्य व शहरातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. १३ सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला प्रारंभ होणार असून, २३ सप्टेंबर रोजी विसर्जन केले जाईल. त्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत गणेश भक्तांना सूचना मांडण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, कार्याध्यक्ष हरीश आलिमचंदानी, संग्राम गावंडे, महासचिव सिद्धार्थ शर्मा, अॅड. सुभाषसिंह ठाकूर, विजय जयपिल्ले, विजय तिवारी, मनोज खंडेलवाल आदींनी केले आहे.