अकोला : अवैध गावठी दारू तयार करणे, ती विकणे व तिची वाहतूक करणे, पोलिसांनी कारवाई करूनही त्याच्यावर कोणताही परिणाम न होणे व गुन्हेगारी पृष्ठभूमी असणे, अशा गंभीर प्रकरणाची दखल घेत बार्शीटाकळी तालुक्यातील वाघजळी येथील सदाशिव श्रीराम जाधव (वय ३०) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी (एमपीडीए) अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षकांच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर सदाशिव श्रीराम जाधव याला एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सदाशिव श्रीराम जाधव याचेवर यापूर्वी अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणे, दारूची वाहतुक करणे तसेच अवैद्य गावठी दारू विक्री करणे असे बरेच गुन्हे दाखल आहेत. विवीध कलमान्वये त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याचेवर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वत:चे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर व्यक्ती सराईत हातभट्टीवाला असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश १८ सप्टेंबर रोजी पारीत केला. त्यानंतर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशावरून सदाशिव श्रीराम जाधव याचा तात्काळ शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले व जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, नापोशि. मंगेश महल्ले यांनी तसेच बार्शिटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तिरूपती राणे, तसेच नापोकॉ प्रतापसिंग राठोड, पोकॉ. किशोर, पोकॉ. गोपाल लाखे यांनी केली.
दारूची अवैधरित्या विक्री करणारा एक वर्षासाठी स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:10 PM