तेल्हारा : तालुक्यात बागायती पट्टा असल्याने बऱ्याच गावातील शेतकरी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. यावर्षी कांद्याला एकरी २५ ते २८ हजार रुपये खर्च आला व त्यात कांदा निघताच व्यापारी ३५० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कांदा खरेदी करीत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.सिंचन क्षेत्र असल्याने तालुक्यातील बेलखेड, माळेगाव, शेरी, भांबेरी, तळेगाव बाजार, बहिरखेड, अडगाव, आकोली, तळेगाव डौला, बाभूळगाव, डौला, हिंगणी, चांगलवाडीसह बऱ्याच गावात शेतकऱ्यांनी शेती उत्पादनात वाढ व्हावी म्हणून जवळपास ७ ते ८ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड केली. सध्या कांदा काढणे सुरू झाला असला, तरी कांद्याला पाहिजे तसा भाव बाजारपेठेत नाही. व्यापारी सध्या ३५० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कांदा घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात यावर्षी कांदा पिकावर विविध रोग आल्याने कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. एकरी १०० ते २५० क्विंटल होणारा कांदा सध्या ५० ते ७० क्विंटल उत्पादन होत आहे. कांदा पिकाला सुरुवातीपासून एकरी २५ हजार रुपये खर्च येत आहे. शेती तयार करणे, पऱ्हाटी उपटणे एकरी १००० रु, डबल फंटन ८०० रुपये, सरी काढणे ४०० रुपये, दांड काढणे ३५० रुपये, वाफे करणे ६०० रुपये, लागवड ५ हजार रुपये, कांदा काढणे ३ हजार रुपये, खत ३००० हजार, फवारणी २ हजार, पाणी देणे ३००० हजार, रखवाली ३०००, निंदन १५०० रुपये असा खर्च येतो. मात्र, मागील वर्षांपासून कांद्याला पाहिजे तशी मागणी नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील वर्षी बेलखेड येथील शेतकऱ्याने कांद्याला भाव मिळाला नसल्याने शेतातच विष घेऊन आत्महत्या केली होती. यावर्षीही कांद्याला बाजारपेठेत पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. यावर्षी पाच एकरामध्ये कांदा लागवड केली. मात्र, कांद्यावर सुरुवातीपासूनच विविध रोग आल्याने कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. सध्या व्यापारी ३५० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कांदा घेत असल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनाने कांदा एक हजार रुपये भावाने खरेदी करावा.- गोपाल अग्रवाल,कांदा उत्पादक शेतकरीसध्या बाजारपेठेत कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात मागणी नसल्याने कमी भावात कांदा जात आहे. शेतकऱ्यांनी काही दिवस कांदा भरून ठेवल्यास कांद्याला भाव येऊ शकतात.- विष्णू नागपुरे,कांदा व्यापारी
कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल
By admin | Published: April 24, 2017 2:09 AM