अकोला: कांदा साठविण्याची लगबग सुरू आहे. दुष्काळाच्या झळा सोसत कांदा पीक काढले; मात्र बळीराजाला आजच्या भावात खर्चदेखील निघत नसल्यामुळे जिल्हय़ातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.वर्षभर सर्वच पिकांमधून तोटा सहन करावा लागल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करणार्या बळीराजाच्या मनाला थोडासा आधार देण्यासाठी शेतकर्यांचीच मुले सरसावल्याचे सोशल मीडियावर फिरणार्या संदेशांवरून दिसत आहे. कांदा खाणारे ग्राहक व राजकीय नेत्यांच्या शेतकर्यांबद्दलच्या अनास्थेबाबत भावनिक व विनोदी मजकुराची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. शेतकर्यांच्या भावना व मेहनतीची कदर करणारे संदेश ह्यशेअरह्ण करण्याची चढाओढ सध्या दिसून येत आहे. कधी सरकारच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार्या कांद्याने दुष्काळाशी दोन हात करणार्या बळीराजाच्या डोळ्यातून चांगलेच पाणी काढले आहे. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने व उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सततच्या दुष्काळाने होरपळून निघणार्या कष्टकरी शेतकरी वर्गाला नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी बदलणार्या हवामानाशी दोन हात करूनही बाजारात मिळणार्या मातीमोल भावामुळे पुरत्या जेरीस आलेल्या शेतकर्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याचे नाव घेत नाही. चालू वर्षी खरीप हंगामात खराब हवामानामुळे वाया गेला होता, तर रब्बीत बदलत्या हवामानाबरोबरच बाजारात सध्या मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे.बाजारात रब्बीच्या कांद्याला मिळत असलेला दर शेतकर्यांनी कांदा पिकासाठी केलेल्या खर्चाचीही वसुली होत नसल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे.
कांद्याचे दर कोसळले; शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2016 2:26 AM