लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिसरातील कांदा संपल्याने आणि बाहेरून येणार्या कांद्याची आवक घटल्याने अकोल्यात गेल्या आठवड्यापासून कांद्याचे भाव वधारले आहेत. सातशे-आठशे रुपये क्विंटलचा कांदा अकोल्यात दोन हजार ते पंचवीसशे रुपये क्विंटलच्या दराने विकला जात आहे. दोन महिन्याआधी अकोल्यात बेभाव मिळणारा कांदा अचानक वधारल्याने सर्वसामान्यांची भाजी महागली आहे. अकोला जिल्ह्यात आणि सीमावर्तीय भागात मोठय़ा प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. मात्र, तरीही अकोल्याला हा कांदा पुरेसा नसतो. त्यामुळे जूननंतर अकोला परिसरात नाशिक, लासलगाव येथून कांदा मोठय़ा प्रमाणात येत असतो. दरवर्षी याच कार्यकाळात लासलगावचा कांदा येतो. मात्र, नाशिक परिसरात आलेल्या पुरामुळे यंदा लासलगावचा कांदाही अपुरा पडतो आहे. कारण लासलगावचा कांदा राज्यातच नव्हे, तर देश आणि आशिया खंडात सर्वत्र पोहोचतो. मात्र, यंदाची स्थिती काही निश्चित नाही. त्यामुळे अकोला पोहोचविला जाणारा कांदाही महाग झाला आहे. जो कांदा कधीकाळी सातशे ते हजार रुपये क्विंटल होता, तोच कांदा आता दोन हजार ते पंचवीसशे रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. कांद्याचे भाव कडाडल्याने आता सर्वसामान्य माणसाच्या घरातील किचनचे बजेट बिघडले आहे. कारण दररोजच्या वापरात असलेला कांदा महागल्याने नागरिकांच्या डोळ्य़ात पाणी आले आहे. वधारलेल्या भावाने कांद्याला चांगले दिवस आले असले, तरी यातील किती पैसा कास्तकारांच्या घरात जातो, हा मात्र संशोधनाचा विषय ठरतो आहे.
कांद्याचे भाव गेल्या आठ दिवसांपासून वधारले असले, तरी ही स्थिती स्थिर राहणारी नाही. लासलगावचा कांदा येतो आहे. सोबतच राज्याबाहेरूनही कांदा येण्यास सुरुवात झाली की पुन्हा काद्यांचे भाव कमी होतील.-नीलेश पवित्रकार, काद्यांचे ठोक व्यावसायी, अकोला.