भाजीपाल्याच्या दरात नेहमीच चढउतार होत असते. अकोल्यातील ठोक भाजीपाला मार्केट तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विक्रेत्यासह परिसरातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत असतात. त्यामुळे येथील दर हे नियंत्रणात असतात. तसेच जुन्या बाजारात दररोज बाजार भरत असल्याने अनेक जण सकाळच्या वेळेस येथे गर्दी करीत असतात. तर शहरातील प्रत्येक गल्लीत हातगाडीवरून भाजीपाला विक्री केली जाते. या दोघांच्या दरांमध्ये मोठा फरक राहतो. कांद्याच्या दरात १० ते १२ रुपयांचा फरक असतो.
तुकाराम चौकात कांदा ३० रुपये, डाबकी रोड परिसरात २८ रुपये किलो
शहरातील तुकाराम चौकात, डाबकी रोडवर बहुतांश ठिकाणी भाजीपाल्याची विक्री केली जाते. अनेक नागरिक या भाजीपाला विक्रीच्या दुकानांवरून कांदा खरेदी करतात. तुकाराम चौकात ३० तर डाबकी रोड परिसरात २८ रुपये किलो कांदा मिळत आहे.
पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात!
जिल्ह्यात भाजीपाल्याची सर्वात मोठी बाजारपेठ अकोला शहरात आहे. या ठिकाणी भाजीपाल्याचे ठोक भाव ठरतात.
व्यापारी शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा खरेदी करतात आणि तो किरकोळ विक्रेत्यांकडे सोपवतात. या प्रक्रियेत व्यापारी आपला नफा काढून घेतो.
शेतकऱ्यांकडून व्यापारी, व्यापाऱ्यांकडून किरकोळ विक्रेते आणि ग्राहक अशी साखळी असते. किरकोळ व्यापारी दारावर भाजीपाला विक्री करतात. तेही आपली मजुरी काढतात.
अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही!
होलसेल भाजी बाजारातून किमान दोन ते पाच किलो एकाच प्रकारची भाजी खरेदी करावी लागते. एवढा भाजीपाला घरात साठवून ठेवणेही नुकसानीचेच आहे. तसेच दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी लागणारा पेट्रोल अथवा रिक्षा खर्च पाहता घराजवळ दोन-पाच रुपये जास्त लागलेले परवडतात.
- मीरा शिंदे, गृहिणी
भाजीपाला घरात लागतोच किती? अर्धा-पाव किलोसाठी दूरवर पायपीट तसेच गर्दीत जाण्यापेक्षा घराजवळ येणाऱ्या विक्रेत्याकडून आम्ही हवी ती भाजी खरेदी करतो. होलसेल भावात एकदम जादा भाजीपाला आणण्यापेक्षा रोज दारात ताजी भाजी मिळते, शिवाय बाजारात जाण्याचा वेळही वाचतो.
- निधी चौधरी, गृहिणी
एवढा फरक कसा?
किरकोळ विक्रेता माल घेऊन गेल्यानंतर तो विकला जातो की नाही याची शाश्वती नसते. राहिलेला माल फेकून द्यावा लागतो. त्यामुळे विकल्या गेलेल्या मालाचेच पैसे मिळतात. ठोक व किरकोळ दरामध्ये किलोमागे ५ ते १० रुपयांपर्यंत फरक असू शकतो.
- अनंत चिंचोळकर, भाजीपाला व्यापारी
हातगाड्यावर मावेल इतकीच भाजी ठोक बाजारातून खरेदी करताना थोडा जास्त भाव मोजावा लागतो. शहरात भाजी विक्रीसाठी पायपीट करावी लागते. घरपोच भाजी मिळत असल्याने व दरात फारसा फरक नसल्याने ग्राहकांना महाग वाटण्याचे काहीच कारण नाही.
- विजय नागे, फिरता भाजी विक्रेता
हा बघा दरांमधील फरक (प्रति किलो दर)
ठोक किरकोळ
कांदा १८ ३०
बटाटा १५ २०
टोमॅटो २० ३०
पालक ३० ५०
लसूण ६० १००
मेथी ३५ ८०
कोथिंबीर ५० ८०
वांगे ३५ ६०
कारले १८ ३०
अद्रक २० ४०