अकोला : गेल्या आठवड्याच्या तुलनेत याही आठवड्यात भाज्यांचे स्थिर राहिले असले तरी कांदे, लसूण, बटाट्यांचा रुबाब मात्र वाढलेलाच आहे.
दुसरीकडे पालक, मेथीसारख्या पालेभाज्यांचे दर गडगडले असून, मेथीचे भाव एकदमच खाली आले आहेत.
गेल्या आठवड्यात भाज्यांची आवक वाढली हाेती. त्यामुळे भाजांचे दर आवाक्यात आले हाेते. तेच चित्र या आठवड्यातही कायमच आहे. यामुळे सामान्य घरातील गृहिणींचे बजेट बचतीचे झाले आहे. शहरात फुलकोबी ३० ते ४० रुपये, वांगी ३० ते ४० रुपये, मेथी ३० ते ४० रुपये, पालक ३० रुपये, दाेडके ४० रुपये, कोथिंबीर १० ते २० रुपये, हिरवी मिरची ४० ते ६० रुपये, कारली ४० रुपये, बटाटे ५० ते ६० रुपये, कांदे ५० ते ६० रुपये, लसूण १२० ते १६० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. सध्या वाढत्या थंडीमुळे पालेभाज्यांना ग्राहकांची माेठी पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
डाळी शंभरच्यावरच
भाजीपाल्याच्या तुलनेत डाळींचे दर स्थिर असले तरी तूर डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ या प्रमुख डाळींचे दर १०० ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. त्यात तूर आणि उडीद डाळ प्रतिकिलो १२० रुपयांच्या घरात आहे.
काेथिंबीर उतरली
काही दिवसांपूर्वी या भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते. त्यामध्ये काेथिंबीरचाही समावेश हाेता. आता मात्र काेथिंबीरचा प्रती किलाेचा दर हा १० ते ३० रुपयांपर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे कोबी, वांगी, भेंडी, पालक, मेथीचे दर निम्मे झाल्याने दिलासा मिळाला.
बटाट्यांचा भाव मात्र अजूनही वाढलेलेच आहे. भेंडी काेथिंबीर आणि वांगे यांचे भाव उतरल्यामुळे या भाज्यांना पसंती आहे.
- दीपाली खवले
गृहिणी
मेथी, पालक, गोबी, टमाटे याचे भाव एकमदच उतरल्यामुळे ते मजुरीलाही परवडत नाहीत; मात्र हा नाशवंत माल असल्याने शेतात ठेवताही येत नाही.
- उमेश देशमुख
उत्पादक
नवीन बटाटे बाजारात आले आहेत; मात्र ग्राहकांची पसंती जुन्या बटाट्यांनाच आहे या बटाट्यांची साहजिकच आवक कमी आहे. त्यामुळे भाव वाढलेले आहेत.
- रणजित सिकची
भाजीविक्रेता