लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील सर्व ३ लाख ५२ हजार ३१२ सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले आहे; मात्र हस्तलिखित सात-बाराप्रमाणे ‘आॅनलाइन’ सात-बारात क्रमांक १५ ‘पीक-पाहणी’चा कॉलम वगळण्यात आल्याने आॅनलाइन सात-बारामध्ये कूळ व वहितीदारांची नावे दिसतच नसल्याची बाब समोर आली आहे.शासनाच्या ई-फेरफार कार्यक्रमांतर्गत सन २०१२ मध्ये जिल्ह्यातील सर्व ३ लाख ५२ हजार ३१२ सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले असून, शेतकऱ्यांचा सात-बारा आॅनलाइन करण्यात आला. तेव्हापासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना हस्तलिखित सात-बाराचे वितरण बंद करण्यात आले. सुरुवातीपासूनच आॅनलाइन सात-बाराचा विषय वादाचा आणि चर्चेचा राहिला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘नेट कनेक्टिव्हिटी’च्या अभावाने आॅनलाइन सात-बारा वितरणात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे नागरिकांना सात-बारा वितरणाच्या कामात विलंब लागत होता, तसेच आॅनलाइन सात-बारामध्ये नावे गायब होणे, नाव आडनावात फरक पडणे, खरेदी नोंदीमध्ये विकणाऱ्याचेही नाव तसेच राहणे, जमीन क्षेत्र कमी दिसणे अशा अनेक चुका आणि त्रुटी आढळत असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील संगणकीकृत सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, त्रुटी दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्ययावत आॅनलाइन सात-बारा उपलब्ध झाला असला, तरी पूर्वी हस्तलिखित सात-बारामध्ये असणारा पीक पाहणी (१५ क्रमांक)चा कॉलम या आॅनलाइन सात-बारातून वगळण्यात आला आहे. आॅनलाइन सात-बारामध्ये हा कॉलम नसल्याने, सात-बारामधील कुळांची व वहितीदारांची नावे दिसत नाहीत. त्यामुळे १९४९ पासून आतापर्यंत हस्तलिखित सात-बारावर कुळांची व वहितीदारांची दिसणारी नावे आता आॅनलाइन सात-बारामधून गायब झाल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.जमीन महसूल नियम खंड ४ नुसार आॅनलाइन सात-बारामध्ये जमीन मालक शेतकरी आणि पीक पेऱ्याची माहिती नोंदविण्यात येते. तसेच जमीन मालकाव्यतिरिक्त कूळ व वहितदारांच्या नावांची नोंद संबंधित तलाठ्याच्या अहवालानुसार नमुना ७ -ब मध्ये केली जाते.- संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, बाळापूर.आॅनलाइन सात-बारामध्ये जमीन मालकासह पीक-पेऱ्याचा तपशील नोंदविण्यात येतो आणि कूळ व इतर अधिकारातील व्यक्तींच्या नावांची नोंद नमुना ७ ब-मध्ये केली जाते.-ओमप्रकाश अग्रवालउपविभागीय अधिकारी, अकोला.
‘आॅनलाइन’ सात-बारात ‘पीक-पाहणी’च वगळली!
By admin | Published: July 14, 2017 1:38 AM