अकोला, दि. २0- जिल्हय़ामधील खासगी माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे, अतिरिक्त पदांची ऑनलाइन माहिती प्राप्त झाल्यानंतर अखेर मंगळवारी सकाळपासून न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये जिल्हय़ातील ११७ पैकी ५९ अतिरिक्त शिक्षकांचे शाळांवर ऑनलाइन समायोजन करण्यात आले आहे. आता उर्वरित ५८ अतिरिक्त शिक्षकांना समायोजनाची प्रतीक्षा आहे. चौथ्या फेरीदरम्यान त्यांचेही समायोजन पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येईल. गत दीड महिन्यांपासून जिल्हाभरातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये रिक्त पदे आणि अतिरिक्त शिक्षकांच्या पदांची माहिती मागविण्याचे शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सुरू होते; परंतु अनेक शाळांना अतिरिक्त शिक्षक आपल्या शाळांमधील रिक्त पदांवर देण्यात येतील आणि आपले कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल, अशी भीती असल्याने माहिती पाठविण्यात दिरंगाई करण्यात येत होती. तसेच अनेक शाळांनी अलीकडेच भरमसाठ डोनेशन घेऊन शिक्षक पदावर रुजू झालेल्या कनिष्ठ शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून वाचविण्यासाठी ज्येष्ठ शिक्षकांची बिंदूनामावली, सेवाज्येष्ठता डावलली आणि त्यांनाच अतिरिक्त ठरविण्याचा प्रयत्न केला; परंतु शेकडो ज्येष्ठ शिक्षकांनी संस्थेच्या विरोधात दंड थोपटले. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे कारण नसतानाही अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकांनी तक्रारी नोंदविल्या आणि शिक्षणाधिकार्यांना न्याय देण्याची मागणी केली होती. पसंतीने निवडल्या शाळाअतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया मंगळवारी न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये राबविण्यात आली. अतिरिक्त ठरलेल्या ५९ शिक्षकांना शाळा निवडीसाठी पसंतीक्रम देण्यात आले होते. त्यांनी ऑनलाइनवर पसंतीची शाळा टाकण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षकांनी पसंतीने शाळा निवडली. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया पार पाडली.पारदर्शक पद्धतीने शांततेत अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. पसंतीने शाळा निवडण्याची संधी मिळाल्याने शिक्षक समाधानी आहेत. उर्वरित अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया लवकरच होईल. - प्रकाश मुकुंद, माध्यमिक शिक्षणाधिकारी
११७ पैकी ५९ अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन!
By admin | Published: September 21, 2016 1:57 AM