अकोला - शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्यांसाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थींऐवजी बोगस अपंगच घेत असल्याचे उघडकीस आले. त्यातून अपंगांना प्रमाणपत्र वितरणातील त्रुटी लक्षात आल्यात. या त्रुटी दूर करण्यासाठी अपंगांना आॅनलाइन प्रमाणपत्र देणे सुरू केले. या सुविधेंतर्गत ५ आॅगस्टपर्यंत राज्यातील १ लाख २२ हजार ५४४ अपंगांनी लाभ घेतला असून, त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. अर्ज केल्यानंतर दस्तऐवज व अपंगत्व सिद्ध न करू शकलेल्या २0 हजार ४५ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले. अपंगांसाठी शासकीय योजनांमध्ये खास निधी राखून ठेवण्यात येतो. हा निधी खऱ्या लाभार्थींपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी राज्य शासनाकडे वेळोवेळी प्राप्त झाल्यात. शासकीय नोकरीत अपंगांसाठी जागा राखीव राहतात. या जागा बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून बळकावण्यात येत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली. याचे कारण अपंगांना प्रमाणपत्र वितरण करण्यात येत असलेल्या प्रणालीतील त्रुट्या होत्या. त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासोबतच प्रमाणपत्रांचे आॅनलाइन वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी अपंगांकडून ‘अपंगत्वाचे विश्लेषण प्रणाली’ या संगणक प्रणालीचा वापर करून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. अपंगांना प्रमाणपत्र वितरणासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांच्या दस्तऐवजाची व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आॅनलाइन प्रमाणपत्र वितरित केले जात आहे. या प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यातील अपंगांचा ‘डाटा’ एकाच ठिकाणी गोळा होण्यास मदत झाली आहे. ही प्रणाली सुरू झाल्यापासून ५ आॅगस्ट २0१५ पर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यातून १ लाख ६५ हजार ४७२ अंपगांनी आॅनलाइन अर्ज सादर केलेत. त्यापैकी १ लाख २२ हजार ५४४ अपंगांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. २0 हजार ४५ अपंगांनी अर्ज केलेत, पण त्यांना दस्तऐवजांची पूर्तता करता आली नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे.
१ लाखांवर अपंगांना आॅनलाइन प्रमाणपत्र
By admin | Published: August 07, 2015 1:29 AM