मास्क न लावणाऱ्या ४३ जणांना दंड
अकाेला : शहरात जीवघेण्या काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा नागरिकांना विसर पडला असून बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी फिरणाऱ्या व ताेंडाला मास्क न लावणाऱ्या नागरिकांविराेधात मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी मनपाने गठित केलेल्या पथकांनी मास्क न लावणाऱ्या ४३ नागरिकांजवळून ८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला.
नियमांचे उल्लंघन; व्यावसायिकांना दंड
अकाेला : संसर्गजन्य काेराेना विषाणूची बाधा हाेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे. ही परिस्थिती सर्वत्र असल्याने राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांविराेधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. शनिवारी मनपाने नियमाचे उल्लंघन करणाऱ्या तीन व्यावसायिक प्रतिष्ठानांना ३ हजार रुपये व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या एका व्यावसायिकाला १ हजार रुपये दंड आकारला.
साहित्य परत करा!
अकाेला : महापालिकेच्या विद्युत व अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य मनपाच्या आवारात ठेवण्यात आले असून यामध्ये फायबर ऑप्टिक केबल, विद्युत वायर, लघू व्यावसायिकांच्या हातगाड्या आदी साहित्याचा समावेश आहे. जप्त केलेले साहित्य मागील अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असून ते परत करण्याची मागणी लघू व्यावसायिकांनी केली आहे.
चाचणीसाठी पुढाकार घ्या !
अकाेला : शहरातील ४५ वर्षे वयोगटातील व त्यापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांनी काेराेना लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून व चेहऱ्यावर मास्क आणि हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
काेराेनाचे नियम पायदळी
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्यामुळे शहरात काेराेनाचा प्रसार वाढला आहे.
नदीपात्रात फवारणी
अकाेला : माेर्णा नदीपात्रात तुंबलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास वाढली असून त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. या परिसरात फवारणी करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक गिरीश जाेशी यांनी मनपाकडे केली हाेती. हिवताप विभागाने नदीपात्रात फवारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे रहिवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.