अकोला : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून खासगीरीत्या बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांची आॅनलाईन नाव नोंदणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ३० जुलै ते २५ आॅगस्टपर्यंत नोंदणी करता येईल.विद्यार्थ्यांना खासगीत बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज आॅनलाइन पद्धतीनेच भरावे लागणार आहेत. आॅफलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. विद्यार्थ्यांनी खासगीरीत्या बारावी परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, मूळ गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र, दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी स्कॅन करून अपलोड करावी. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाइलच्या माध्यमातून कागदपत्रांचे छायाचित्र काढून अपलोड करावेत. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाइल क्रमांक ईमेल आयडी द्यावा. भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांना पाठविली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिलेल्या मुदतीत जमा करावी. नावनोंदणीसाठी ५०० रुपये नोंदणी व प्रक्रिया शुल्क १०० आहे. नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांस निवडलेली शाखा व माध्यमनिहाय कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांनी करावी. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोंडी श्रेणी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागेल. परराज्यातील विद्यार्थ्यांनी १७ नंबरचा अर्ज भरला असेल, तर ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत संबंधित विद्यार्थी परीक्षेचा अर्ज भरणार आहे. त्याच कनिष्ठ महाविद्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र विभागीय मंडळाकडे पाठवावे. अशी माहिती अमरावती विभागीय मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी दिली. (प्रतिनिधी)