आगाखान पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव जहा. : लर्निंग लायसन्ससाठी आता ऑनलाइन परीक्षा होणार असून, चालकांना फॉर्म भरणे, ‘फी’चा भरणा घरबसल्या करता येणार आहे. या परीक्षेमुळे मात्र अशिक्षितांची गोची होणार आहे. आरटीओ कार्यालयातर्फे देण्यात येणारे लर्निंग लायसन्स ९ ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. लर्निंग लायसन्स मिळण्याकरिता उमेदवाराला ऑनलाइन अपॉइंटमेंटसोबतच ऑनलाइन संगणक परीक्षाही द्यावी लागणार आहे. आरटीओच्या शिकस्त इमारतमध्ये ऑनलाइनचा हा खेळ येत्या ९ ऑगस्टपासून रंगणार आहे. ऑनलाइन परीक्षासाठी आरटीओ कार्यालयात एका कक्षेत नऊ संगणक बसविण्यात आले आहेत. ऑनलाइन परीक्षा १५ गुणांची राहणार असून, या परीक्षेत नऊ गुण (६0 टक्के) घेणे अनिवार्य आहे. ही ऑनलाइन परीक्षा अशिक्षितांसाठी कठीण ठरणार आहे. शासनाच्या ऑनलाइन परीक्षेचा फटका गोरगरीब लोकांना बसण्याची शक्यता आहे. शासनाच्या या पारदर्शक कारभारात सर्वसामान्यांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
दंडाच्या रकमेत मोठी वाढमोटार अधिनियमात बदल करण्यात आल्याने दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. अशातच ऑनलाइन पद्धतीने लर्निंग लायसन्स काढण्यासाठी नागरिकांना नेहमीप्रमाणे आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतील, यात तिळमात्र शंका नाही.
शिकस्त इमारतीत केली उधळण आरटीओ कार्यालय रेल्वे स्टेशनजवळील महापालिकेच्या शिकस्त शाळेत आहे. या इमारतीची अवस्था दयनीय आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी या शिकस्त इमारतीत जीव मुठीत घेऊन शासकीय योजना व नियमांची अंमलबजावणी करताना दिसतात; मात्र भाड्याच्या शिकस्त इमारतीमध्ये ऑनलाइन परीक्षांसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. संगणक बसविलेल्या कक्षाची दुरवस्था झालेली आहे. खिडक्या तुटलेल्या आहेत.
सारथी ४.0 ही संगणकीय ऑनलाइन परीक्षा उपप्रादेशिक कार्यालयात सुरू होत आहे. या सेवेमुळे उमेदवाराला ऑनलाइन परीक्षा देऊन पास व नापासचा निकाल कळणार आहे. १५ प्रश्नांपैकी नऊ प्रश्नांची उत्तरे देणे अनिवार्य राहणार आहे. या सेवेचा अर्जदार फॉर्म भरण्यासाठी घरबसल्या लाभ घेऊ शकेल. परीक्षा मात्र त्यांना संगणकावर द्यावी लागणार आहे. त्यासाठी सात मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. - अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.