शालेय विद्यार्थ्यांमध्ये काेराेनाचा प्रसार टाळण्याच्या उद्देशातून केंद्र व राज्य शासनाने ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षणाचे धडे देण्याचे निर्देश जारी केले. ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षण क्षेत्रात माेठा बदल झाला असला तरी त्याचे दुष्परिणामही समाेर येऊ लागले आहेत. यादरम्यान, शासनाने साेशल डिस्टन्सिगचे पालन करीत इयत्ता ९वी, १०वी आणि १२वीचे वर्ग सुरू करण्याला परवानगी दिली. दुसरीकडे इयत्ता पहिली ते आठवी आणि अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे शिक्षणाचे धडे देण्याचे निर्देश आहेत. हा विराेधाभास चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मुळावर उठला आहे. या प्रकाराची जिल्हाधिकारी व शासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे मत काेचिंग क्लासच्या संचालकांनी बाेलताना व्यक्त केले.
-----
शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांना अभ्यासाचे कितपत आकलन झाले, याचा अंदाज येताे. विद्यार्थ्यांमधून व्यक्त हाेणारा प्रतिसाद शिक्षकांना आणखी प्रेरित करताे. ऑनलाइनमुळे ही सर्व प्रक्रिया एकतर्फी झाली असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हाेत असल्याचे समाेर येत आहे. विद्यार्थ्यांमधील मानसिक ताणतणाव पाहता शासनाने वेळ न दवडता ऑफलाइन शिक्षणाला परवानगी द्यावी, या विषयासाठी ‘लाेकमतने’पुढाकार घेतल्याने आभारी आहाेत.
-नितीन बाठे, संचालक, समर्थ काेचिंग क्लासेस
आमचा १५ मार्च २०२० पासून विद्यार्थ्यांसाेबतचा संपर्क तुटला आहे. ऑनलाइन शिक्षणाची संकल्पना नवीन असल्यामुळे लहान वयातील विद्यार्थ्यांच्या हातात माेबाइल दिल्याने त्याचा दुरुपयाेगही वाढला. ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित हाेऊन ते मानसिक तणावात सापडले आहेत. ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे नियंत्रण राहले नाही. माेबाइलवर क्लासला उपस्थित राहून दुसरीकडे गेम खेळतात,अशाही स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत.
-ललित काळपांडे, संचालक, ललित ट्युटाेरिअल्स
ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम ध्यानात येताच पंजाब, राजस्थान व इतर राज्यांमध्ये ऑफलाइन शिक्षणाच्या अनुषंगाने ठाेस हालचाली केल्या जात आहेत. केंद्र व राज्य शासनाने सर्व उद्याेग, व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली असताना ऑफलाइन शिक्षणाला परवानगी का नाही, असा सवाल उपस्थित हाेत आहे. शाळेप्रमाणेच काेचिंग क्लासमध्येही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जाईल. काेचिंग क्लास बंद असल्याने हाॅटेल, खाणावळ, भाेजनालय यांसह विविध व्यवसाय प्रभावित झाले आहेत.
-अजय देशपांडे, संचालक, मिग्स काेचिंग क्लासेस
...फाेटाे ठाकरे...