अकोला : समग्र शिक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. परंतु अद्यापपर्यंतही जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे पुस्तकांविना विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळा भरत आहे. यंदा इयत्ता पहिली ते आठवीतील एक लाख ३८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबांनी गावी स्थलांतर केले. शेकडो मजूर, कामगार परप्रांत, परजिल्ह्यांत परतले. त्यामुळे शेकडो मुलांना शाळा सोडावी लागली. शाळांमधील पटसंख्या घसरली. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. २८ जूनपासून जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांनाविना सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यावर पुस्तके मिळणे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थ्यांना अद्यापही पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेताना अडचणी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोफत पाठ्यपुस्तके तातडीने देण्याची मागणी केली आहे.
१० टक्केच मुलांनी केली पुस्तके परत!
गत दोन वर्षांपासून शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरावर भर दिला. यंदा ५ हजार ३६ पालकांनी शाळांमध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके परत केली. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाठ्यपुस्तकांची मागणीसुद्धा कमी झाली आहे.
शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार ५ हजार ३६ पालकांनी त्यांच्या पाल्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळांमध्ये आणून दिली. या पाठ्यपुस्तकांचा फेरवापर पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे.
गतवर्षी समग्र शिक्षा योजनेंतर्गत १ लाख ६० हजार ८७१ शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ३८ हजार २२६ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. पाठ्यपुस्तक महामंडळाकडून येत्या आठ दिवसांमध्ये पुस्तके मिळण्याची शक्यता आहे.
पुस्तके नाहीत अभ्यास कसा करणार?
२८ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु पाठ्यपुस्तके नसल्यामुळे शिक्षण कसे घ्यावे. पुस्तकांशिवाय अभ्यासक्रम, शिक्षकांनी शिकविलेले सुद्धा कळत नाही. त्यामुळे आम्हाला लवकर पुस्तके द्यावीत.
-सम्यक पोहुरकर, विद्यार्थी जि.प. शाळा दहीगाव गावंडे
ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु पुस्तके नाही. त्यामुळे अभ्यासक्रम काय आहे. हे कळत नाही. पालकांनी काही जुनी पुस्तके आणली. त्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. समग्र शिक्षा अभियानातून पुस्तके देण्यात यावी.
-पायल चव्हाण, विद्यार्थिनी जि.प. शाळा कौलखेड जहॉगीर
वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
पहिली २९४१०
दुसरी २९२४८
तिसरी २९७८०
चौथी ३०१८५
पाचवी २९६५७
सहावी २९२८९
सातवी २८८४७
आठवी २८७९७