अकोला: राज्यावर सद्यस्थितीत कोविडच्या तिसऱ्या लाटेचे सावट आहे. या परिस्थितीत कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधक लस हीच प्रभावी ठरणार आहे. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यातील केवळ ०.६ टक्के नागरिकांनीच कोविडच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत. ही आकडेवारी थक्क करणारी आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील लसीकरण सुरू झाल्याने मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील लसीकरणाला वेग आल्याने आरोग्य यंत्रणेला थोडासा दिलाला मिळाला आहे. कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १४ लाख ५२ हजार ९०२ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाने १६ जानेवारीपासून वाटचाल सुरू केली. जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला असून, आतापर्यंत ३ लाख ८८ हजार ३६० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी ३ लाख ५ हजार २७६ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण लक्षाच्या २१ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर केवळ ८३ हजार ८४ म्हणजेच ०.६ टक्के लोकांनीच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोविडच्या डेल्टा प्लसच्या निमित्ताने तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात असताना, जिल्ह्यातील लसीकरणाची ही आकडेवारी थक्क करणारी आहे.
वयोगटानुसार लसीकरण
वयोगट पहिला डोस - दुसरा डोस
१८ ते ४४ - ५९,५४३ - ६,५३७
४५ वर्षांवरील - २,२०,९०६ - ६२,३९८
१८ वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर, जिल्ह्यातील लसीकरणाला वेग आला आहे. लसीकरणासाठी आवश्यक लसीचा साठाही पुरेपूर उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात लसीकरणाला वेग येईल.
- डॉ.मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला