अकोला : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ हजार २०० शेततळी करण्याचे उद्दिष्ट (टार्गेट) निश्चित करण्यात आले असले, तरी मार्च अखेरपर्यंत गत दीड वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ १ हजार ३१ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील शेततळ्यांच्या कामांचे ‘टार्गेट’ पूर्ण होणे अद्याप दूरच आहे.वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत आॅनलाइन अर्ज केल्यानंतर निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकºयांना शेततळे खोदकामासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. शेततळ्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर कृषी विभागामार्फत शेततळे कामाच्या अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांत ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत जिल्ह्यात ३ हजार २०० शेततळ्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ १ हजार ३१ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित शेततळ्यांची कामे अद्याप प्रलंबित असल्याने, शेततळ्यांच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण होणे अद्याप बरेच दूर आहे.२१६९ शेततळ्यांची कामे केव्हा पूर्ण होणार?मागेल त्याला शेततळे योजनेत गत दीड वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ १ हजार ३१ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २ हजार १६९ शेततळ्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेततळ्यांची कामे करता येणार नाहीत. त्यामुळे येत्या जूनपर्यंत जिल्ह्यातील प्रलंबित शेततळ्यांची कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.