प्रफुल्ल बाणगावकर / कारंजा लाड (जि. वाशिम) अमरावती विभागातील लहान- मोठे मिळून एकू ण ४६0 जलप्रकल्पात केवळ ११ टक्के जलसाठा उरला असून, मॉन्सूनचे दमदार आगमन झाले नाही, तर विभागातील पाचही जिल्ह्यात येत्या काही दिवसांत पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.मागील तीन वर्षांपासून अमरावती विभागात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडत आहे. त्यामुळे अमरावती विभागातील विविध ठिकाणच्या जलप्रकल्पात पुरेसा जलसंचय झाला नाही. त्यामुळे उन्हाळा लागण्यापूर्वीच अनेक जलप्रकल्प कोरडे झाले, तर काही प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती मिळून या पाच जिल्ह्यांत एकूण लहान-मोठे ४६0 जलप्रकल्प आहेत. या जलप्रकल्पात ९ जून २0१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार केवळ ११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती विभागात अमरावती येथील उध्र्व वर्धा, यवतमाळ येथील पूस, बेंबळा आणि अरुणावती, अकोला येथील काटेपूर्णा, तर बुलडाणा येथील वाण, नळगंगा, पेनटाकळी, आणि खडकपूर्णा असे एकूण ९ मोठे जलप्रकल्प आहेत. त्यापैकी पूस, पेनटाकळी आणि खडकपूर्णा हे प्रकल्प कोरडे पडले असून, अरुणावती प्रकल्पात ३ टक्के, काटेपूर्णा प्रकल्पात २ टक्के, तर नळगंगा प्रकल्पात ४ टक्के जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पात १३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील वाण प्रकल्पात ३७ टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता येत्या काही दिवसांत मॉन्सूनचे आगमन जोरदार झाले नाही, तर पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अमरावती विभागात प्रशासनाच्यावतीने एकूण २८९ गावांत २७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
अमरावती विभागातील प्रकल्पांत केवळ ११ टक्के जलसाठा
By admin | Published: June 11, 2016 2:48 AM