रवी दामोदर
अकोला : पावसाअभावी अकोलेकरांवरसुद्धा जलसंकट निर्माण झाले आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस पडला नसल्याने महान धरणामध्ये पाण्याची पातळी खोली गेली आहे. धरणामध्ये ११.०३४ दलघमी म्हणजे १२.७७ टक्के पाणी उपलब्ध असल्याने, महापालिका प्रशासनाने १ जुलैपासून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाळा सुरू झाला असला तरी, मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक भागांत पेरणी आटोपली असून, मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जलस्त्रोतसुद्धा आटत असून, पाण्याची भीषण टंचाई ओढावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्याची मागणी व सद्य:स्थिती लक्षात घेता, पाणीपुरवठा करणे सोयीचे व्हावे, याकरिता १ जुलैपासून अकोला शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.