अकोला : मान्सूनचे आगमन होऊन २३ दिवस झाले आहे; परंतु अद्यापही धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. वऱ्हाडातील ५११ प्रकल्पांमध्ये ३३.३७ टक्के साठा उपलब्ध आहे. मागील १५ दिवसांमध्ये वऱ्हाडातील प्रकल्पांत केवळ २ टक्के जलसाठा वाढला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये एकूण मोठे, मध्यम व लघु, असे ५११ प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये अमरावतीमधील ऊर्ध्व वर्धा, यवतमाळमधील पूस प्रकल्प, अरुणावली, बेंबळा, अकोलामधील काटेपूर्णा, वाण प्रकल्प, तर बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा, अशा १० प्रकल्पांचा समावेश आहे. यावर्षी वेळेआधी राज्यात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात झाली आहे; परंतु सर्वदूर पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. अमरावती विभागात दमदार पाऊस न झाल्याने प्रकल्पांची तहान भागलेली नाही. बहुतांश लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. सद्य:स्थितीत वऱ्हाडातील प्रकल्पांमध्ये ३३.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या १५ दिवसांआधी या प्रकल्पांमध्ये ३१.४७ टक्के साठा होता. यामध्ये केवळ २ टक्के साठा वाढला आहे.
मोठ्या ९ प्रकल्पांमध्ये ३८.६६ टक्के जलसाठा
वऱ्हाडातील मोठ्या ९ प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही घट कायम आहे. काटेपूर्णा, नळगंगा, खडकपूर्णा धरण क्षेत्र भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे या सर्व ९ प्रकल्पांमध्ये केवळ ३८.६६ टक्के जलसाठा आहे.
कोराडी प्रकल्प १०० टक्के
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील बहुतांश भागात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, तीन-चार दिवसांआधी बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कोराडी हा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला. तर ज्ञानगंगा प्रकल्पाचा साठा ६९.६७ टक्क्यांवर पोहोचला.