लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत येत्या शैक्षणिक सत्र २0१८-१९ साठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची १९ जानेवारीपासून नोंदणी सुरू आहे. आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील पालकांना प्रवेशासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरवर्षी प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित घटकांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती, धर्मातील दिव्यांग मुले, तसेच दुर्बल घटकांतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असणारे, खुल्या प्रवर्गासह विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना जिल्हय़ातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया येते. यंदा सत्र २0१८-१९ साठी सुद्धा २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांची सध्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील १९५ इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आणखी २८ शाळांची आरटीई अंतर्गत नोंदणी होणे बाकी आहे. जिल्हय़ातील २२३ शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्राथमिक शिक्षण विभागाला पुणे येथून २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक देण्यात येईल. त्यानंतरच खर्या अर्थाने प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. सध्या जिल्हय़ात आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. याची पालकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली.
यामुळे उघडत नाही संकेतस्थळअकोला जिल्हय़ातील इंग्रजी माध्यमांच्या आरटीई अंतर्गत नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. २५ टक्के प्रवेशासाठीचे संकेतस्थळ उघडत नसल्याची ओरड पालक करीत आहेत. शाळांची नोंदणीची प्रक्रिया आटोपल्यानंतरच संकेतस्थळ सुरू होईल आणि जिल्हय़ात २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारल्या जातील.
जिल्हय़ामध्ये आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच २५ टक्के प्रवेशाचे वेळापत्रक देण्यात येईल. त्यानंतरच पालकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरावेत. - प्रशांत दिग्रसकर,शिक्षणाधिकारी, प्राथमिक