अकोला: यावर्षीच्या पावसाळ्यात सप्टेंबरअखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ २६ दिवसांमध्ये पाऊस पडला असून, जिल्ह्यातील सातही तालुक्यात सरासरी ६५५.९0 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दरवर्षी पावसाळ्यातील चार महिन्यांच्या काळात जिल्ह्यात १ जून ते ३0 सप्टेंबरपर्यंत सरासरी ६९७.0३ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्या तुलनेत यावर्षीच्या पावसाळ्यात गेल्या चार महिन्यांमध्ये म्हणजेच १ जून ते ३0 सप्टेंबरपर्यंत ६५५.९0 मि.मी. पाऊस झाला. यंदाच्या पावसाळय़ात झालेला पाऊस हा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६ टक्के कमी आहे. एकूण सरासरी ९४.0६ टक्के पाऊस ३0 सप्टेंबरपर्यंत झाला. त्यामुळे परतीच्या पावसावर शेतकर्यांच्या आशा टिकून होत्या. यंदा जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यांच्या १२२ दिवसांच्या कालावधीत केवळ २६ दिवसच पावसाने हजेरी लावली. पावसाने खंड दिल्याने आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, यावर्षी जिल्ह्यात मुगाचे पीक हातून गेले असून, सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही घट झाली. कपाशी पिकाच्या वाढीवर परिणाम झाल्याने, या पिकाचे उत्पादनही घटणार असल्याची स्थिती आहे. पिकाच्या उत्पादनात घट झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे.
केवळ २६ दिवस पडला पाऊस
By admin | Published: October 08, 2015 1:43 AM