अकोला : जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. वाढत्या तापमानापासून बचावासाठी कोविड केअर सेंटरमध्ये साधा कुलरही नसल्याने रुग्णांना केवळ पंख्यांचा आधार घ्यावा लागत आहे. अशावेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी जिल्ह्यात सात ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. याठिकाणी रुग्णांसाठी जेवणासह राहण्याची सुविधा करण्यात आली आहे. वैद्यकीय निरीक्षणात इतर सर्व बाबी चांगल्या असल्या तरी वाढत्या उष्म्याने रुग्णांची डोकेदुखी वाढवली आहे. एप्रिल महिना असल्याने जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मात्र, उष्म्यापासून बचावासाठी रुग्णांना केवळ पंख्यांचा आधार घ्यावा लागत आहे. बहुतांश कोविड केअर सेंटरमध्ये साधा कुलरही उपलब्ध नसल्याने रुग्णांचे उष्म्यामुळे हाल होत आहेत. अशातच ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यास कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची स्थिती आणखी गंभीर होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
एकूण कोविड केअर सेंटर - ७
दाखल पॉझिटिव्ह रुग्ण - १७९
एप्रिल तापला
मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील तापमान वाढले आहे. बुधवारी जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे अकोलेकरांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.
दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे उष्म्याचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कोविड केअर सेंटरमधील परिस्थिती चिंताजनक आहे. उष्म्यापासून रुग्णांच्या संरक्षणासाठी कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक सुविधा पुरविण्याची गरज आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये कोविड रुग्णांच्या जेवणाची चांगली सुविधा करण्यात आली असून, याठिकाणी डॉक्टरही रुग्णांची काळजी घेत आहेत. मात्र, उन्हाचा पारा तापल्याने रुग्णांना उष्म्याचा सामना करावा लागत आहे. उष्म्यापासून बचावासाठी केवळ पंख्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
- अंकुश देशमुख, रुग्ण
कोविड केअर सेंटरमध्ये स्वच्छता केली जाते. शिवाय जेवणही चांगले दिले जाते, मात्र उन्हाचा पारा वाढल्याने उष्म्याचा सामना करावा लागत आहे. या उष्म्यापासून दिलासा देण्यासाठी योग्य उपाययाेजना केल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.
- संदीप देशमुख, रुग्ण