राम देशपांडे अकोला, दि. १८- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेसुद्धा 'कॅशलेस'च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एसटीने प्रवास करणार्या नागरिकांना 'कॅशलेस' व्यवहार करता यावेत, यासाठी मुंबई येथील केंद्रीय कार्यालयामार्फत राज्यातील ३१ विभागांना 'पॉस' मशीन वितरित करण्यात आल्या आहेत. यापैकी अमरावती प्रादेशिक विभागाच्या वाट्याला केवळ चारच पॉस मशीन आल्या असल्याने, एसटी महामंडळाची ह्यकॅशलेसह्णच्या दिशेने अत्यंत धिमी वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. 'कॅशलेस'च्या दिशेने पावले उचलणार्या एसटी महामंडळाच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयामार्फत राज्यातील ३१ विभागीय कार्यालये, बसस्थानके व आगारांना 'एसबीआय'च्या 'पॉस' मशीन वितरित करण्यात आल्या. त्यापैकी केवळ चारच पॉस मशीन अमरावती प्रादेशिक विभागाच्या वाट्याला आल्या असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी ह्यलोकमतह्णला दिली. ३३ बसस्थानके व ४ विभागीय कार्यालये असा मोठा व्याप असलेल्या अमरावती प्रादेशिक विभागात दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल रोकड विभागात गोळा होतो. रिझर्व्ह बँकेने केलेल्या सूचनेनंतरसुद्धा एसटी महामंडळाने 'कॅशलेस' होण्यासाठी आरक्षण खिडक्यांवर, थेट प्रवासी गाड्यांसाठी वितरित केल्या जाणार्या तिकीट काउंटर्सवर अशा विविध ठिकाणी 'पॉस' मशीन लावणे अपेक्षित होते; मात्र 'कॅशलेस'साठी अत्यंत तुटपुंजा उपाययोजना केल्या जात असून, अकोला विभागाच्या वाट्याला आलेली एक पॉस मशीन मध्यवर्ती बसस्थानकावरील आरक्षण तिकीट खिडकीवर लावण्यात आली आहे. अन्य विभागात यासंदर्भात कुठलीच तजवीज करण्यात आली नसल्याने, गैरव्यवहार होणार नाही, अशी शाश्वती देणे अशक्य असल्याचे मत अकोला विभागीय कार्यालयातील अधिकार्यांनी 'लोकमत'कडे व्यक्त केले.
अमरावती प्रादेशिक विभागात केवळ चारच ‘पॉस’ मशीन!
By admin | Published: March 19, 2017 2:07 AM