अकोला, दि. २२- कलाकार जगला, तरच रंगभूमी जगेल, त्याची जाणीव असल्याने अकोलेकरांनी खर्या अर्थाने कलावंतांच्या संवेदना जपण्याचे कार्य केले आहे. माझ्यातील कलाकार व मी स्थापन केलेल्या संस्थांना अकोलेकरांनी जिवंत ठेवले आहे. नवोदित कलाकारांसाठी शहरात एक हक्काचे व्यासपीठ असावे, हे माझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. जी माणसं शब्द पाळतात, तीच आयुष्यात मोठी होतात. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांस्कृतिक भवनाचा प्रश्न मार्गी लावला असून, लवकरच शहरात अद्ययावत सांस्कृतिक भवन साकारणार असल्याने, मी खर्या अर्थाने स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन रंगयोगी राम जाधव यांनी केले. ह्यरसिकाश्रयह्ण व ह्यअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईह्ण अकोला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २२ मार्च रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित गौरव सोहळय़ात सत्कारमूर्ती म्हणून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. या गौरव सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, हरियाणाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत जाधव, फडके अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश फडके, नारायणराव खंडेलवाल, वाराणसी येथी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुफी गायक कृष्णकांत शुक्ला व हरियाणाचे लोककलाकार महाबीर गुड्ड उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीमागील रंगयोगी राम जाधव यांची तळमळ व्यक्त केली. त्यांनी पाहिलेले हे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचे स्पष्ट करून, त्यांनी राम जाधव यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अमरावतीचे आयजीपी विठ्ठलराव जाधव, प्रा. सतीश फडके व राम जाधवांचे ज्येष्ठ पुत्र प्रशांत जाधव यांनी मनोगत व्यक्त करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर आकृती स्टुडिओचे संचालक छायाचित्रकार विजय मोहरील यांनी राम जाधव यांच्या छायाचित्रातून साकारलेल्या कालदर्शिकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दुसर्या सत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी संगीताचा नजराणा सादर केला. प्रारंभी कथ्थक नृत्य मंदिराच्या नृत्यांगणा ईशानी साठे यांनी कथ्थक नृत्य सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर अनिरुद्ध खरे यांनी अभंग, वाराणसी येथून आलेले सुफी गायक कृष्णकांत शुक्ला व लोककलाकार महाबीर गुड्ड यांनी संगीतमय नजराणा सादर केला.
कलाकार जगला, तरच रंगभूमी जगेल - राम जाधव
By admin | Published: March 23, 2017 2:39 AM